Coronavirus : दिलासादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 1121 ‘कोरोना’मुक्त

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. रुग्ण वाढत असताना कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. आज दिवसभरात 1121 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. रुग्ण बरे होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील वाढत असल्याने चिंता वाढली आहे. आज दिवसभरात पिंपरी चिंचवड शहरात 969 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 566 जणांचा मृत्यू झाला आहे.

गुरुवारी एकाच दिवशी 24 जणांचा मृत्यू झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहराचा रेडझोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड मनपा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी साडेसहा ते शुक्रवारी दुपारी 4 वाजेपर्यंत शहरामध्ये 969 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 27 हजार 078 एवढी झाली आहे. आज आढळून आलेल्या 969 रुग्णांपैकी 960 रुग्ण हे शहरातील आहेत. तर 9 रुग्ण शहराबाहेरील आहेत. त्यांच्यासह 373 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच शहरातील 50 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याच दरम्यान 21 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

यामध्ये 16 रुग्ण शहरातील आहेत तर 5 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहरातील मृतांचा आकडा 566 वर पोहचला आहे. यामध्ये 460 रुग्ण शहरातील तर 106 रुग्ण शहराबाहेरील आहेत. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. आज दिवसभरात 1121 रुग्णांची कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 18 हजार 794 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या शहरामध्ये 4827 रुग्ण अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज शहरामध्ये रहाटणी, पिंपळे गुरव, मोरवाडी, संत तुकारामनगर, थेरगाव, वाल्हेकरवाडी, मोशी, काळेवाडी, दापोडी, रुपीनगर, दिघी, बिजलीनगर, नेहरुनगर, शिरुर, नारायणगाव, चाकण, येरवडा येथील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.