पिंपरी : सामाजिक सुरक्षा पथकाच्या आणखी एका ‘स्कॉड’ची स्थापना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी(Pimpri )चिंचवड पोलीस आयुक्तालय झाल्यापासून कार्यरत नसलेल्या सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना सोमवारी करण्यात आली. त्यानंतर या पथकाने वेश्या व्यवसायात अडकलेल्या मुलींची सुटका केली, मटका अड्यावर छापे टाकले. यानंतर लगेच सामाजिक सुरक्षा पथकाच्या आणखी एका ‘स्कॉड’ची पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्थापना केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची स्थापना झाली. त्यानंतर शहरात गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली. शहरात पाच गुन्हे शाखा पथक, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, आमली पदार्थ विरोधी, खंडणी, दरोडा विरोधी पथक, सायबर गुन्हे शाखा, वाहन चोरी विरोधी पथक स्थापन करण्यात आली. मात्र सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना करण्यात आलेली नव्हती.

शहरात, पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत देहविक्री, ‘स्पा’च्या नावाखाली वेगळेच उद्योग सुरु होते. यामुळे शहरात स्वतंत्र सामाजिक सुरक्षा विभागाची आवश्यकता होती. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहत तत्काळ या पथकाची स्थापना केली आहे. पोलीस आयुक्तांनी सामाजिक सुरक्षा पथकाची दोन स्कॉड तयार केली आहेत.

नव्याने स्थापन केलेल्या सामाजिक सुरक्षा स्कॉड दोन मध्ये पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, पोलीस कर्मचारी संदीप गवारी, विपुल जाधव, दिपक साबळे, हेमंत खरात, अमोल शिंदे, संतोष केंगले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापूर्वीच स्कॉड एक मध्ये नियुक्त्या केल्या आहेत.