पिंपरी : नशा आणणारी औषध खरेदीसाठी मेडिकलची ‘बोगस’ पावती

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मद्यपानापेक्षा वेगवेगळ्या प्रकारची मेडिकल औषधे पिऊन नशा करण्याचे प्रकार वाढत आहे. अशी औषधे मिळविण्यासाठी चक्क एका मेडिकल स्टोअर्सची बनावट पावती तयार करुन होलसेल दुकानातून औषधे खरेदीचा प्रयत्न करण्यात आला पिंपरी पोलिसांनी एका १९ वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे.

याप्रकरणी चेलाराम आधारामजी चौधरी (वय ४०, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, चौधरी यांचे भगवती मेडिकल या नावाचे मेडिकल दुकान आहे. त्यांच्या नावाचा खोटा शिक्का तयार करुन एका कागदी चिठ्ठीवर इंग्रजीत nitroson १० एमजी आणि tossex सिरप अशी दोन औषधे लिहिली व ती औषधे ते चिंचवडमधील कुंदन एजन्सीमधून दोघे जण घेत होते. त्यावेळी अजय दर्डा यांना शंका आली म्हणून त्यांनी चौधरी यांना फोन करुन या औषधाबाबत विचारले असता त्यांनी आपण औषध आणण्यासाठी कोणाला पाठविले नाही, असे सांगून ते औषध आणण्यासाठी आलेल्या दोघांना पाहिले असता त्यांच्याकडील चिठ्ठीवर लिहिलेले औषध व त्यावर असलेला शिक्का हा भगवती मेडिकलचा नसल्याने सांगितले.

त्यांच्या नावाचा शिक्का तयार करुन होलसेल औषध विक्री करणाऱ्या दुकानात दाखवून नशादायक औषधे खरेदी करण्याचा प्रयत्न केला गेला. हे तरुण घेत असलेली औषधे निद्रानाश असलेल्या लोकांना दिली जातात़ तसेच या औषधांचे साईट इफेक्ट असून अ‍ॅल्कोहल सेवन केले असताना ती घेण्यात येऊ नये, असा स्पष्ट इशारा त्यावर देण्यात आला आहे. असे असताना त्याचा वापर करण्याचा नशा येण्यासाठी केला जाऊ लागला असल्याचे दिसून येत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/