वाकडकर यांच्या वतीने पोलीस ठाण्यात ‘सॅनिटायझेशन टनेल’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाकड पोलीस ठाणे परिसर निर्जंतुक करण्यासाठी प्रवेशद्वारावर युवा उद्योजक रामभाऊ वाकडकर यांच्या वतीने सामाजिक बांधिलकेतून ‘सॅनिटायझेशन टनेल’ बसविण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक निरीक्षक हरीश माने आणि रामभाऊ वाकडकर यांनी ‘सॅनिटायझेशन टनेल’ चा वापर केला.

पोलीस ठाण्यात येणारी प्रत्येक व्यक्ती या प्रवेशद्वारातूनच प्रवेश करेल. त्यामुळे ठाण्यात होणारा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जाईल. अशा प्रकारचे यंत्र बसविणारे शहरातील हे पहिलेच पोलीस ठाणे आहे. कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाचे संक्रमण होऊ नये, याकरता सर्व अधिकारी,कर्मचारी यांचे निर्जुंतुकीकरण करण्यात येणार आहे. या सॅनिटायझर टनेलमध्ये गेल्यानंतर सॅनिटायझरची फवारणी अंगावर होऊन पोलिसांना संसर्गाचा कोणताही धोका निर्माण होणार नाही. याचा वापर पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबर ठाण्यात येणाऱ्या सर्व नागरिकांना देखील करण्यात येणार आहे.

यावेळी रामभाऊ वाकडकर म्हणाले, संपूर्ण राज्य कोरोना महामारीशी लढत आहे. आणि या लढ्यामध्ये कोरोना संकटाच्या विरोधात डॉक्टरांप्रमाणे पोलीसही लढत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजीही घेणे आवश्यक आहे. याकरता एक जागरूक नागरिक म्हणून सामाजिक बांधिलकेतून वाकड पोलीस ठाण्याला ‘सॅनिटायझेशन टनेल’ बसविण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाला नागरिकांनी देखील सहकार्य करावे असे आवाहन वाकडकर यांनी केले आहे.