चाकणमधील कंपनीच्या मालकाचा खून करणार्‍या चौघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कंपनीत घुसून मालकाचा खून करणाऱ्या चार जणांना चाकण पोलिसांनी मध्यरात्री अटक केली असून तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहेत. जीवन दत्ता डोंगरे (सध्या रा. बिरदवडी ,ता. खेड, मूळ रा, मदनसुरी, ता. निलंगा, जि.लातूर ) अश्विन रावसाहेब कांबळे (२३, रा, पानसरे चाळ, खंडोबामाळ, चाकण ), शरद किसन धुळे (३८, रा. खंडोबामाळ, चाकण, मूळ रा, शेलू, ता.पुसद, जि.यवतमाळ ) , रज्जत शब्बीर सय्यद (२२, सध्या रा. धाडगे आळी, चाकण, ता. खेड) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार जणांची नावे आहेत. तर सतरा वर्षीय दोन अल्पवयीन युवकांनाही याच खून प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

सोमवारी (दि.१७) सकाळी बिरदवडी येथील व्ही.एच.डी. इंजिनिअरिंग कंपनीचे मालक हरिश्चंद्र किसनराव देठे (४५, सध्या रा. विश्रांतवाडी , पुणे, मूळ रा. रुई , जि. उस्मानाबाद) यांचा त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या महिलेचा पती जीवन डोंगरे याच्याशी किरकोळ वाद झाला होता. त्याचा राग मनात ठेवून जीवन डोंगरे याने त्याचे वरील साथीदारांना सदर कंपनीच्या गेटवर आणून कंपनीचे मालक देठे यांचा दगडाने ठेचून खून केला होता. घटनेनंतर सर्व संशयित आरोपी फरारी झाले होते.

चाकण पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा वरील सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करून चाकणमधील विविध ठिकाणांहून ताब्यात घेऊन अटक केली असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिली. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत. खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला मुख्य संशयित डोंगरे आणि त्याचे साथीदार या भागात रिक्षातून प्रवाशी वाहतूक करण्याचे काम करीत असल्याची बाब समोर आली आहे. अवैध प्रवाशी वाहतूक करणा-यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनेकांचा शिरकाव झाल्याची बाबही यामुळे समोर आली आहे.

You might also like