नागरिकांना मदत करण्यास टाळाटाळ करणे ‘त्या’ ९१ पोलिसांना पडले महागात

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – मदतीसाठी नागरिकांनी पोलिसांना फोन केल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन नागरिकांना मदत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ९१ पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांना पूर्वी प्रमाणेच मंगळवारी तब्बल सात तास परेड करायला लावली.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी पोलीस आयुक्तालय सुरु झाल्यानंतर नागरिकांसाठी अनेक स्तुत्य योजना सुरु केल्या आहेत. त्यातीलच एक ती ‘फोन अ फ्रेंड’ हा आहे. यामध्ये नागरिकांनी फोन केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात संबंधित पोलीस ठाण्यातील एक पथक घटनास्थळी जाऊन संबंधित व्यक्तीला मदत करत होते. यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढला होता. तसेच पोलीस आपल्या मदतीला येतात असे चित्र होते. मात्र आयुक्तालय जस जसे जुने होऊ लागले तस तसे पोलीस कर्मचारी आयुक्तांच्या योजनांकडे कानाडोळा करु लागले.

याचा परिणाम म्हणजे नागरिकांना मदत मिळत नव्हती. याचा प्रत्यय पोलीस आयुक्तांना येऊ लागला. एखाद्या तक्रारदाराकडून पोलिसांना मदतीसाठी फोन केला असता पोलीस फोनवरच माहिती घेत होते व घटनास्थळी तास ते दोन तास उशीरा पोहचत होते. तर दुसऱ्या बाजूला नोंदवहीवर दहा मिनीटात पोहचले असा शेरा देत होते. आयुक्तांनी स्वतः तक्रारदारांशी संवाद साधला आणि काही ठिकाणी पोलीस घटनास्थळी पोहोचलेच नाहीत अथवा खूप उशीरा पोहोचल्याचे समोर आले.

यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी सोमवारी (दि. ११) आयुक्तालयात संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना बोलावून चांगलीच कानउघडणी केली. तसेच जे कर्मचारी कामचुकारपणा करत होते अशा ९१ कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तालयासमोर सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत परेड करायला लावली. यामुळे पुन्हा एकदा कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

ह्याही बातम्या वाचा –

पिंपरीत हॉटेल चालकावर खुनी हल्ला

कॅप्टनकडून लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीचा विनयभंग

पंतप्रधान पदाबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

अहमदनगर : ॲक्सिस बँकेच्या ‘सीईओ'(CEO), ‘एमडी'(MD)विरुद्ध गुन्हा