Pimpri : मौजमजेसाठी दुचाकी, मोबाईल चोरणारी दुकली पोलिसांकडून गजाआड

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मौजमजा आणि फिरण्यासाठी दुचाकी आणि मोबाइलची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना चिंचवड पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 दुचाकीसह 6 मोबाईल असा एकूण तीन लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई चिंतामणी चौकाजवळील मोकळ्या मैदानात करण्यात आली.

विरेंद्र उर्फ बेंद्या भोलेनाथ सोनी (वय-22 रा. चिंचवडे कॉलनी नं.3, वाल्हेकरवाडी, चिंचवड), आशिष ओमप्रकाश परदेशी (वय-20 रा. तुळजा भवानी मंदिराजवळ, आकुर्डी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत. आरोपींनी चिंचवड, निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंतामणी चौकाजवळील मोकळ्या जागेत दोघेजण संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या ॲक्टीव्हा गाडी बाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. तसेच ताब्यात घेण्यात आलेला बेंद्या सोनी हा सराईत गुन्हेगार असल्याने त्यांना पोलीस चौकीत आणून अधिक चौकशी केली.

चौकशी दरम्यान त्यांनी मौजमजा आणि फिरण्यासाठी निगडी, चिंचवड, वाल्हेकरवाडी येथून पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच चिंचवड आणि वाल्हेकरवाडी येथील उघड्या घरांमधून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 5 दुचाकी आणि विविध कंपनीचे सहा मोबाईल असा एकूण तीन लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर काटे, पोलिस निरीक्षक गुन्हे विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस हवालदार पांडुरंग जगताप सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मारुती कडु, पोलिस नाईक स्वप्निल शेलार, रुषीकेश पाटील, विजयकुमार आखाडे, पोलिस शिपाई नितीन राठोड, गोविंद डोके, अमोल माने, पंकज भदाणे, सदानंद रुद्राक्षे यांच्या पथकाने केली.