OROP ला 5 वर्ष पूर्ण झाल्याने PM मोदींनी दिल्या शुभेच्छा, 20.6 लाख माजी सैनिकांना दिले 42,700 कोटी रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारकडून ’वन रँक, वन पेन्शन’ (ओआरओपी) योजना लागू करण्याच्या निर्णयाला पाच वर्ष पूर्ण झाल्याने सशस्त्र दलाच्या माजी कर्मचार्‍यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी म्हटले की, ही योजना आपल्या माजी सैनिकांच्या कल्याणाच्या दिशेने उचलले गेलेले ऐतिहासिक पाऊल आहे.

पीएम मोदी यांनी ट्विट केले की, ओआरओपीला पाच वर्ष पूर्ण होणे हे महत्वाचे निमित्त आहे. भारत दशकांपासून ओआरओपीची प्रतिक्षा करत होता. अशावेळी भारताने देशाचे रक्षण करणार्‍या महान सैनिकांच्या कल्याणासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले. मी उल्लेखनीय सेवेसाठी माजी सैनिकांना सॅल्यूट करतो. मोदी यांनी संरक्षण मंत्रालयाकडून जारी निर्णयातील महत्वाचे मुद्देदखील पोस्ट केले आहेत.

20 लाखांपेक्षा जास्त पेन्शनर्सना लाभ

पीएम मोदी यांच्या ट्विटनुसार, वन रँक वन पेन्शन योजनेंतर्गत संरक्षण दलांच्या 20,60,220 पेन्शनर्स आणि फॅमिली पेन्शनर्सला 10,795.4 कोटी रूपये देण्यात आले आहेत. ओआरओपी योजनेत वार्षिक रिकरिंग एक्स्पेन्सेस सुमारे 7123.38 कोटी रुपयांचा आहे आणि 1 जुलै 2014 पासून सुरू होऊन सुमारे सहा वर्षांसाठी आहे. अशाप्रकारे एकुण रिकरिंग एक्स्पेन्सेस जवळपास 42740.28 कोटी रूपयांचा आहे.

45 वर्षांपासून सैन्य कर्मचारी करत होते प्रतिक्षा

केंद्रातील भाजपा सरकारने 2014 मध्ये सत्तेत येताच निवृत्त सैनिकांसाठी वन रँक, वन पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा केली होती. वन रँक-वन पेन्शन योजनेंतर्गत हे ठरवण्यात आले की, वेगवेगळ्या वेळी रिटायर झालेल्या एकाच रँकच्या दोन सैनिकांच्या पेन्शनमध्ये मोठे अंतर नसेल. माजी सैन्य कर्मचारी सुमारे 45 वर्षांपासून ओआरओपी लागू करण्यासाठी आंदोलन करत होते. योजनेच्या कक्षेत 30 जून, 2014 पर्यंत सेवानिवृत्त झालेले सैन्य दलाचे कर्मचारी येतात. ओआरओपी लाभार्थ्यांना 2.57 च्या मल्टीप्लिकेशन फॅक्टरने पेन्शनची गणना करताना सातव्या केंद्रीय वेतन आयोगांतर्गत पेन्शनच्या मुल्यांकनाचा लाभसुद्धा मिळाला आहे.