PM-Kisan निधीत घोटाळा, बोगस शेतकरी अकाऊंटची सरकार करणार चौकशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांसाठी असलेल्या पंतप्रधान शेतकरी योजने ( Prime Minister’s Farmers Scheme) मध्ये घोटाळा ( Scam) झाल्याच्या बातम्या मागील अनेक दिवसांपासून येत आहेत. यानंतर आता या योजनेचा लाभ बनावट शेतकरी लाभार्थींनी घेतल्याचे उघड झाल्यावर केंद्र सरकारने आता देशव्यापी चौकशीचे आदेश दिले आहेत.

केंद्र सरकारने या योजनेमध्ये एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम ११.०७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये टाकले होते. यात महाराष्ट्रातील १.१० कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ झाला होता. मात्र यामध्ये घोटाळा झाल्याचे उघड झाल्यानंतर आता याची चौकशी होणार आहे. त्याचबरोबर लाभार्थी हा खरोखर शेतकरी ( Farmer) च आहे याची प्रत्यक्ष खातरजमा करून घेण्यास राज्य सरकारांना केंद्र सरकारने सांगितले आहे. केंद्र सरकार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपये पाठवते.

तामिळनाडूत ( Tamilnadu) या योजनेतील मोठा घोटाळा उघडकीस आला होता. त्यानंतर या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. त्याचबरोबर केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंह तोमर ( Narendra Singh Tomar) यांनी तामिळनाडूत पीएम-किसान योजनेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाल्याचे मान्य केले होते. यामध्ये १५ सप्टेंबर, २०२० पर्यंत ५.९५ लाख लाभार्थींच्या खात्यांची तपासणी करण्यात आली त्यात ५.३८ लाख हे अपात्र होते, असे स्पष्ट झाले.यानंतर अनेक जणांवर कारवाई करण्यात आली असून काहीजणांना थेट कामावरून कमी करण्यात आले आहे.

फसवणुकीची आकडेवारी

एकूण शेतकरी : १४.६४ कोटी

योजनेचे लाभार्थी लाभार्थी : ११.०७ कोटी

महाराष्ट्रातील लाभार्थी : १.१० कोटी

दिलेला निधी : १.१० लाख कोटी

बनावट लाभार्थी : ५.३८ लाख बनावट लाभार्थी तामिळनाडूमधील

त्याचबरोबर आता या बनावट लाभार्थ्यांची ओळख पटवून हा पैसा पुन्हा केंद्राला पाठवण्याची जबाबदारी देखील राज्यांची असल्याचे कृषी मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. त्याचबरोबर या योजनेतील किमान ५-६ टक्के लाभार्थींची प्रत्यक्ष खातरजमा करण्यासाठी केंद्र सरकार पाऊल उचलणार आहे. तसेच या योजनेतील झालेल्या घोटाळ्यांमधील 61 कोटी रुपये परत मिळवण्यात आले, असल्याचे देखील या अधिकाऱ्याने सांगितले.