भारताकडे राफेल विमाने असती तर… मोदींनी केले सूचक विधान 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – भारताकडे राफेल विमाने असती तर भारताने मोठी कामगिरी केली असती असे सूचक विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते नवी दिल्ली या ठिकाणी एका कार्यक्रमात बोलत होते. देश आज एका सुरात म्हणू लागला आहे, भारताकडे आज राफेल विमाने असती तर काय झाले असते, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारत-पाक संबंध ताणले गेले असतानाच नरेंद्र मोदी यांनी राफेल विमान खरेदीचे समर्थन केले आहे.

राफेल करारावरून विरोधक मोदींवर करत असलेल्या आगपाखडीचा मोदींनी खरपूस समाचार घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी राफेल व्यवहाराचे समर्थन करत विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. राफेलवरील स्वार्थी राजकारणामुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. राफेलची कमतरता खऱ्या अर्थाने आज देशाला जाणवत आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

याच कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस सरकारच्या काळात संरक्षणाच्या क्षेत्राकडे कसे दूर्लक्ष केले गेले यावर अचूक बोट ठेवण्याचा प्रयत्न केला. भारतीय लष्कराने २००९ साली देशातील सरकारकडे १ लाख ८० हजार बुलेट प्रुफ जॅकेटांची मागणी केली होती. मात्र ती मागणी काँग्रेसने २०१४ पर्यंत पूर्ण केली नाही. परंतु आम्ही सत्तेत आलो तेव्हा आम्ही २ लाख ३० हजार बुलेट प्रुफ जॅकेट लष्कराला घेऊन दिली आहेत असे नरेंद्र मोदी यांनी म्हणले आहे.