पोलीस वाहून जाणाऱ्यांसाठी बनले देवदूत

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होत असताना पुणे जिल्ह्यामध्ये देखील पावसाने मोठा वेग घेतलेला असताना शिक्रापूर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आला आणि त्या पुरातून कार सह वाहून जाणाऱ्या दोघांना वाचविण्यात शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला यश आले असून वाहून जाणाऱ्यांसाठी पोलीसच देवदूत बनले आहे.

शिक्रापूर ता. शिरूर येथे रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व ओढ्या नाल्यांना पूर आला यावेळी शिक्रापूर येथील ओरा सिटी लगतच्या ओढ्याला देखील मोठा पूर आला यावेळी येथील पुरातून एम एच १४ बि आर ४६४४ हि स्विफ्ट कार वाहून जाऊन पुराच्या मध्यभागी झाडाला अडकली आणि कार मधील दोघे मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागले यावेळी शेजारील नागरिकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ठाणे अंमलदार अनिल जगताप व संतोष शिंदे यांना माहिती दिली असता तातडीने पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, पोलीस हवालदार संजय ढमाळ, पोलीस शिपाई लक्ष्मण शिरसकर, होमगार्ड मनोहर पुंडे, योगेश बधे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली यावेळी पोलीस हवालदार संजय ढमाळ, होमगार्ड मनोहर पुंडे यांनी क्षणाचाही विलंब न करता ओढ्याच्या पुराच्या पाण्यात उडी घेतली त्यांनतर दोरीच्या सहाय्याने पाण्यामध्ये अडकलेल्या युवकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले.

यावेळी पाण्याचा वेग इतका होता कि पोलिसांना देखील धोका पोहचू शकला असता मात्र पोलिसांनी कसलीही पर्वा न करता पाण्यातील दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आणि तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर पाण्यातील दोघांना बाहेर काढण्यात आले यावेळी पोलिसांनी अनुकुमार विश्वनाथ जाधव रा. हिवरे रोड शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे व निसार करीम शेख रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. पिंपरखेड ता. जामखेड जि. अहमदनगर या दोघांना जीवदान देत पाण्यातून बाहेर काढले, यावेळी पाण्यातून बाहेर काढलेल्या दोघांनी पोलिसांना हात जोडत तुम्ही पोलीस नसून खरोखरचे देव आहात असे म्हणून पोलिसांचे आभार मानले तर शेजारील नागरिकांनी देखील शिक्रापूर पोलिसांच्या पथकाचे कौतुक केले असून परिसरातून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होतआहे.