JCB नं पाण्यातून बाहेर काढली तिजोरी, ‘फिल्मी स्टाईल’ लावला बँक रॉबरीचा छडा

जालना : पोलीसनामा ऑनलाइन –   घनसांगवी तालुक्यातील पानेवाडी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 7 लाखांसह तिजोरी चोरट्यांनी लांबविली होती. या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने 24 लावला असून मुद्देमाल जप्त करुन चार आरोपींना अटक केली आहे.

घनसांगवी तालुक्यातील पानेवाडी गावातील जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचे चॅनल गेट आणि दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. चोरट्यांनी बँकेचे लोखंडी तिजोरी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआर चोरून नेला. चोरट्यांनी चोरून नेलेल्या तिजोरीत 7 लाख 28 हजार 168 रुपये होते. रोख रक्कम, 12 हजारांची लोखंडी तिजोरी आणि 10 हजाराचा डिव्हीआर असा एकूण 7 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. चोरट्यांनी लंपास केलेली रोकड पीएम किसान सन्मान योजनेची होती.

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी जालना येथील शिकलकरी मोहल्ला परिसरात शनिवारी अचानक छापा टाकून हरदीपसिंह बबलूसिंग टाक याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी त्याचे सहकारी गोपीसिंग मलखामसिंग कलाणी, किशोरसिंग उर्फ टकल्या रामसिंग टाक, गजानन सोपान शिंगाडे (रा. पाचन वडगाव) यांना ताब्यात घेतले.

खदानीतून काढली तिजोरी

चोरट्यांनी बँकेतुन चोरलेल्या तिजोरीतील रक्कम काढून घेतली. त्यानंतर ती तिजोरी शहरातील द्वारकानगरच्या मागे असलेल्या खदानीत फेकून दिली. पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने ही तिजोरी खदानीतून बाहेर काढली.

चोरलेल्या चारचाकीचा वापर

पानेवाडी येथील शाखेतील तिजोरी आणण्यासाठी चोरट्यांनी चोरलेल्या जीपचा वापर केला. ती जीप शहरातील श्रीकृष्णनगर येथून चोरण्यात आली होती. याप्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी चोरीची ही जीपही ताब्यात घेतली आहे.

एकाने घेतली दुचाकी तर दुसऱ्याने LED

तिजोरितून रक्कम काढल्यानंतर ती वाटून घेण्यात आली. वाट्याला आलेल्या रक्कमेतून एकाने दुचाकीची खरेदी केली होती. तर दुसऱ्याने एलईडी टीव्ही खरेदी केला होता. पोलिसांनी दुचाकी आणि टीव्ही जप्त केला आहे.