10 हजाराची लाच घेताना पोलीस हवालदार अँटी करप्शनच्या जाळ्यात, रात्री 11 वाजता ‘सापळा’ कारवाई

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन –  आपल्यावर कारवाई होऊ नये अथवा दाखल झालेल्या गुन्ह्यात सहकार्य करावे, यासाठी पोलिसांकडून लाच मागितली जात होती पण आता घडलेल्या गुन्ह्यात गंभीर कलम लावण्यासाठी पोलीस फिर्यादीकडूनच पैसे घेत असल्याचे समोर आले आहे. प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात गंभीर कलम लावण्यासाठी व भक्कम पुरावा जमा करण्यासाठी फिर्यादीकडेच १० हजार रुपयांची लाच मागणार्‍या पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रात्री ११ वाजता ही कारवाई करुन लाचखोरांना एक मोठा धडा दिला.

संभाजी श्यामराव पाटील (रा. जे. डी. सी. सी. बँक कॉलनी, शिंदेनगर, जळगाव) असे या हवालदाराचे नाव आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली आहे. जळगावातील २० वर्षाचे तक्रारदार हे रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खुनाचा प्रयत्न (३०७) च्या गुन्ह्यातील फिर्यादी आहेत. त्यांना संभाजी पाटील याने मी तुमच्या गुन्ह्यात गंभीर स्वरुपाची कलमे लावलेली आहे. या केसमध्ये भक्कम स्वरुपाचा पुरावा तयार करुन केस मजबूत करतो. त्यासाठी त्यांच्याकडे १० हजार रुपयांची लाच मागितली.

त्यानंतर तक्रारदारने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतले. पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंदनगर पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना संभाजी पाटील याला अटक करण्यात आली आहे.