‘पोलीसनामा’चा दणका ! पुणे ग्रामीणच्या ‘त्या’ पोलिस स्टेशनमध्ये खोडसाळपणा करून पुरावा केला नष्ट, कर्मचारी निलंबीत

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाईन – शिरुर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हे नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत येत असताना या पोलीस स्टेशन मधील एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस स्टेशनमध्ये खोडसाळपणा करून पुरावा नष्ट केल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सेवेतून निलंबीत करण्यात आले असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथे 22 जुलै रोजी MH 14 HP 7291 हा वाळू वाहतूक करणारा ट्रक वर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे लावण्यात आलेला असताना शिक्रापूर पोलीस स्टेशन मधील पोलीस नाईक हेमंत पांडुरंग इनामे यांनी काही इसमाच्या सहभागाने बेकायदेशीरपणे सदर ट्रक मधील वाळू वर दगडाचे बारीक क्रशखडी टाकून खोडसाळपणा करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.

याबाबत ‘पोलीसनामा’मध्ये (www.policenama.com) वृत्त प्रसारित झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी काही अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते, तर यावेळी पोलिसांवर कारवाई होणार का असे बोलले जात असताना सदर चौकशीमध्ये पोलीस नाईक हेमंत पांडुरंग इनामे (बक्कल नंबर 2188) यांनी गैरकृत्य केले असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले असल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक हेमंत पांडूरंग इनामे यांना सेवेतून तात्काळ निलंबीत केले असून त्यांचे विरुद्ध खातेनिहाय चौकशीचे आदेश देखील दिले.