मावळ, पुरंदरमध्ये धक्कादायक निकालाची शक्यता ! जिल्ह्यातील दोन्ही मंत्री पराभवाच्या छायेत असल्याची ‘चर्चा’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  – विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना महायुतीची पुणे जिल्ह्यात घोडदौड सुरु राहतानाच मावळ आणि पुरंदरमध्ये धक्कादायक निकाल लागल्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. सत्ताधारी युतीच्या दोन्ही मंत्र्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

मावळ मतदारसंघात गेल्या अनेक निवडणुकात भाजपाने वर्चस्व गाजविले आहे. मदन बाफना यांच्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या ५ निवडणुकात यश मिळविला आलेले नाही. पण, यंदा भाजपाच्या बंडखोराला शेवटच्या दिवशी पक्षात घेऊन तिकीट दिल्याने यंदा भाजपाचे कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे यांना धक्का बसू शकतो असे मतदानानंतरचे चित्र आहे.

भाजपाचे नेते सुनिल शेळके यांनी गेल्या वर्षभरापासून मावळ मतदारसंघ पिंजून काढला होता. मात्र, पक्षाने त्यांना तिकीट न देता बाळा भेगडे यांना पुन्हा उमेदवारी दिली. मावळमध्ये निवडणुकीपूर्वी आणि प्रत्यक्ष प्रचाराच्या काळात पैशाचा पाऊस पडल्याचीही चर्चा होती. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या या मतदार संघात अनेक ठिकाणी रात्री सात वाजेपर्यंत मतदान सुरु होते. येथे ६९.२० टक्के मतदान झाले. भाजपाला या ठिकाणी अँटी इन्कम्बसीचा फटका बसण्याची चर्चा आहे. त्याचबरोबर शिवसेना नाराज असल्याचा फायदा सुनिल शेळके यांना झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे या परंपरागत मतदार संघात भाजपाला धक्का बसू शकतो.

पुरंदरमध्ये शिवसेनेचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्यातील लढत चुरशीची झाली. लोकसभा निवडणुकीत संजय जगताप यांनी आपली सर्व ताकद सुप्रिया सुळे यांच्या मागे उभी केली होती. त्याचा परिणाम या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे झाडून सर्व कार्यकर्ते संजय जगताप यांच्या प्रचारात सुरुवातीपासून सहभागी झाले होते.

विजय शिवतरे यांनी आपल्या वक्तव्याने गेल्या काही दिवसात त्यांनी अनेकांना नाराज केले. त्यामुळे शिवसेनेतील काही जण दुखावले गेले होते. त्याचवेळी महायुतीत एकमेकांवर कुरघोडी करण्यामध्ये भाजपाची पुरेशी साथ शिवतरे यांना मिळाली नसल्याची मतदारसंघात चर्चा आहे. या मतदारसंघात शिवसेनेला धक्का बसू शकतो असे अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत. मात्र, हे अंदाज किती खरे ठरतात ते २४ ऑक्टोबरलाच समजणार आहे.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like