द्रोह करणाऱ्या ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा, अन्यथा… : प्रकाश आंबेडकर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी काही पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला असा गंभीर आरोप त्यांनी लावला होता. यावरुन आता विरोधी पक्ष भाजपने टीका केली असताना वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खुलासा केला. राज्यातील काही अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ज्या पोलिसांनी सरकार पाडण्याचा कट रचला त्या अधिकाऱ्यांची नावे जाहीर करावी, हा सरकार विरोधातील द्रोह आहे. त्या अधिकाऱ्यांना मोक्का आणि एनआयए अंतर्गत पकडले गेले पाहिजे, अशी आमची विनंती आहे असं त्यांनी सांगितलं.

तसेच जर अनिल देशमुख यांनी हे केले नाही तर त्यांच्या कार्यालयाबाहेर आम्ही धरणे धरु, आंदोलन करु, पोलीस अधिकारी असले तरी त्यांना द्रोह करण्याचा अधिकार नाही. शिक्षा झालीच पाहिजे आणि अटकही झाली पाहिजे. हा बॉल आता अनिल देशमुख यांच्या कोर्टात आहे. त्यामुळे याबद्दल काय करायचं ते त्यांनी ठरवावं असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

‘अनिल देशमुखांच्या बुद्धीची किव येते, बोलताना 100 वेळा विचार करावा’

राज्यातील काही आयपीएस,आयएएस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. यानंतर राज्यातील विरोधी पक्ष भाजपने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. शरद पवारांसारख्या नेत्यांचं नाव घेतात तेव्हा आपण काय बोललं पाहिजे याचे भान ठेवलं पाहिजे असा टोला भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी लगावला आहे.गृहमंत्र्यांच्या बुद्धीची किव येते, गृहमंत्र्यांनी अशी वक्तव्य करताना 100 वेळा विचार करावा, ज्या अधिकाऱ्यांबद्दल ते बोलत आहेत त्या महिला आहेत. कोणत्याही महिला अधिकाऱ्याचा अपमान करणे योग्य नाही. शरद पवारांकडून गृहमंत्र्यांनी क्लासेस घ्यावेत. संजय राऊतांनीच घरचा आहेर दिला ते बरं झालं असंही लाड म्हणाले.