‘नेते नारायण राणे यांनी “प्रताप सरनाईक हे काही साधू संत नाहीत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. त्यानंतर सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यात घेतल्याचे समोर आले होते. त्यावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आता भाजपाचे नेते नारायण राणे यांनी “प्रताप सरनाईक हे काही साधू संत नाही,” असे म्हणत त्यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे.

नारायण राणे म्हणाले, “सरनाईक यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरु असून, कायदेशीर प्रकरणांवर भाष्य करायचे नसते. ईडी, सीबीआय, कोर्टाचे निर्णय यांच्या चौकशा पूर्ण झाल्याशिवाय आपण प्रतिक्रिया द्यायची नाही. प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत. माध्यमाने पूर्वी त्यांची माहिती घ्यावी. ईडीचा छापा पडला, हे योग्य की अयोग्य ते तुम्ही सांगा, मग आम्ही त्यावरती भाष्य करु,” असे राणे यांनी सांगितलं.

मुंबईत माफिया राज – सोमय्या

भाजपाचे नेते किरीट सोमय्या म्हणाले, “मनी लॉन्ड्रिंग सारख्या प्रकरणात शिवसेना पटाईत आहे. त्यांचे मुखिया यामध्ये अग्रेसर आहेत. यामुळे मला याबाबत कोणतेही आश्चर्य वाटत नाही. मुंबईत माफिया राज असल्याचा आरोप मी यापूर्वीही केला आहे. पालिकेतून कत्रांट, भागीदारीतून प्रचंड पैसा येतो,” याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार – संजय राऊत

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत संजय राऊत म्हणाले, हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र असून, किती सुद्धा दबाव आणला तरी महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे, असा इशारा राऊत यांनी भाजपाला नामोल्लेख न करता दिला.

You might also like