आता पुण्याचा कारभार शनिवारवाड्यातून नाही तर लाल महालातून चालणार…

उमेदवारी जाहिर होण्यापुर्वीच प्रविण गायकवाड यांचा प्रचार सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसने अद्यापही पुणे लोकसभेचा उमेदवार जाहिर केलेला नाही. मात्र, कालच काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविण गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. आता पुण्याचा कारभार शनिवारवाडयातून नाही तर लाल महालातून चालणार. बहुजनांचा आवाज लोकसभेत जाणार अशा स्वरूपाचे संदेश कार्यकर्त्यांना पाठवून लाल महालात बोलाविण्यात आले होते. त्यानंतर गायकवाड यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.

लोकसभा निवडणुकीचे वातवरण तापलेले आहे. काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या प्रविण गायकवाड यांनी दोन आठवडयापुर्वी पासुनच प्रचाराची तयारी केलेली आहे. लाल महालात जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, सध्या देशात हुकूमशाही सारखे वातावरण आहे. एक वेगळीच राजकीय व्यवस्थाच सध्या देशात निर्माण झालेली आहे. आरएसएसचा प्रभाव वाढत चालला आहे. ही व्यवस्था हटविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्‍तेतून घालवावे लागणार असून सध्या देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे.

माझी उमेदवारी अद्यापही निश्‍चित झाली नसली तरी हे प्रश्‍न अधिक गंभीर आणि महत्वाचे आहेत. सध्या सर्व बहुजनांनी एकत्र येवुन लढण्याची गरज आहे. काँग्रेस पक्ष हा सर्व विचारधारांना सामावून घेणारा बहूजनांचा पक्ष आहे. आगामी 5 वर्षानंतर पुन्हा निवडणुका होतील की नाही याची भिती आहे. एकंदरीतच काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या प्रविण गायकवाड यांनी प्रचारास जोरदार सुरूवात केली आहे. मात्र, सर्व कार्यकर्ते पक्षाकडून कोणाला अधिकृतरित्या उमेदवारी जाहिर होते याची वाट पहात आहेत.