नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा ‘विक्रम’, 18 तासामध्ये 4 बाळंतपण

नीरा  : पोलीसनामा ऑनलाइन( मोहंम्मदगौस आतार) –  जिल्हा परिषदेच्या प्रा.आरोग्य केंद्रात गेल्यानंतर रूग्णांना नेहमी वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जाण्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. मात्र पुरंदर तालुक्यातील नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी घाटगे यांनी मोठया धाडसाने पुरेसा कर्मचारीवर्ग नसताना देखील शनिवारी (दि.११) अठरा तासांत एक अवघड केस असलेल्या महिलेचे, दोन कार्यक्षेत्रातील महिलांचे व एक कार्यक्षेत्रा बाहेरील महिलेचे नॉर्मल बाळंतपण करून विक्रम करून रूग्णांमध्ये सरकारी दवाखान्यााविषयी विश्वासाहर्ता निर्माण केली आहे.

पिंपरे खुर्द ( ता.पुरंदर ) येथील सासरी असलेली महिला बाळंतपणासाठी होळ ( ता. बारामती ) येथे माहेरी गेली होती . त्या महिलेला आठ महिने पूर्ण झाल्यानंतर त्रास जाणवू लागल्यानंतर ती महिला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेली असता तेथील डॉक्टरांनी बाळाचे वजन कमी असून बाळाला धोका असल्याने बारामती येथिल सिव्हील हॉस्पिटल येथे जाण्यास सांगितले होते. त्यामुळे सदर गरोदर महिलेच्या सासर व माहेरकडील लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाल्याने पिंपरेखुर्द ( ता.पुरंदर) येथील सासरच्या लोकांनी शनिवारी (दि.११) सकाळी सहा वाजता सदर महिलेस नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सदर महिलेची केस अवघड असल्याने मोठा धोका पत्करून बाळंतपण सुव्यवस्थित केले. मात्र जन्मजात मुलगा रडत नसल्याने तसेच त्या बाळाचे हृदय बंद अवस्थेत असल्याचे आढळल्याने डॉ. घाटगे यांंनी स्वतः त्या बाळाला तातडीने रुग्णवाहिकेमधून नीरा येथील खाजगी बालरोगतज्ञांंकडे घेऊन गेले. त्या दरम्यान त्या बाळावर उपचार करीत असताना रस्त्यात त्या बाळाने प्रतिसाद दिल्यानंतर त्याला जीवदान मिळाले. त्यानंतर त्या बाळावर बालरोग तज्ञांच्या निगराणी खाली अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याचे डॉ.घाटगे यांनी सांगितले.

शनिवारी (दि.१२) रात्री आठ वाजता नीरा येथील एका गरीब कुटुंबातील गरोदर महिला बाळंतपणासाठी अचानक आल्याने त्या दुसऱ्या महिलेचेही बाळंतपण सुव्यवस्थित करण्यात आले. सदर महिलेने पावणेतीन किलो वजनाच्या मुलीला जन्म दिला. तसेच रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्राबाहेरील सोमेश्वरनगर ( ता.बारामती) येथील एक महिला बाळंतपणासाठी आल्याने त्या तिसऱ्या महिलेचेही रात्री साडेदहा वाजता बाळंतपण सुस्थितीत केले असून सदर महिलेने मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर रात्री साडेबारा वाजता मांडकी येथून दौंडज ( ता.पुरंदर ) येथे स्थलांतरीत झालेली महिला बाळंतपणासाठी आली असताना ती वेळ न पहाता तातडीने मध्यरात्री पाऊणे दोन वाजता त्या चौथ्या महिलेचे नॉर्मल बाळंतपण करून आम्ही २४ तास रुग्णसेवेसाठी सदैव तयार असल्याचे डॉ. अश्विनी घाटगे यांनी सांगितले .

दरम्यान, नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी घाटगे यांनी शनिवारी (दि.११) आपला वाढदिवस असताना देखील मोठा धोका पत्करून अठरा तासांत चारही महिलांचे सुस्थितीत बाळंतपण करून विक्रम केला. तसेेच

रूग्णांमध्ये सरकारी दवाखान्यााविषयी विश्वासाहर्ता निर्माण केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like