विजेच्या लपंडावामुळे लोणी काळभोरसह 5 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या

पुणे : (लोणी काळभोर) पोलीसनामा ऑनलाइन – पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, सोरतापवाडी, कुंजीरवाडी, म्हातोबा आळंदी, उरुळी कांचन या परिसरात मागील तीन दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कदमवाकवस्ती येथील खोले वस्ती व लोणी स्टेशन परिसरात मागील दोन दिवसापासून विजेचा लपंडाव सरू आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

कदमवाकवस्ती हद्दीतील घोरपडेवस्ती येथे रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना दिवसभर घराबाहेर पडता आले नाही. लोणी काळभोर येथील रामदरा बाजूकडे राहणार्‍या लोकांना पावसाचा फटका बसला आहे. वाहतुकीच्या रस्त्यावरुण दीड ते दोन फुट पाणी वाहत असल्याने परिसराचा संपर्क तुटला होता. लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील पाटील वस्ती, खोमणे वस्ती, या ठिकाणी राहणार्‍या लोकांच्या घरामद्धे पाणी गेल्याचे दिसून आले. बाजारमळा या ठिकाणी जाणार्‍या नागरिकांची ओढ्यावरून वाहत असलेल्या पाण्यामुळे तारांबळ उडाली.

आळंदी म्हातोबा या ठिकाणी मुख्य रस्त्यावर असलेल्या रेल्वे पूलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने गावाकडे जाणारी व येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच जगताप मळा येथील जवळदरा (म्हातोबा मंदिर ) परिसरातील वनविभागाने बांधलेले (मातीनाला ) दोन बंधारे व सुतारदरा येथील कृषिविभागाने बांधलेला मातीनाला (बंधारा) फुटल्यामुळे शेतामध्ये असलेल्या बाजरीच्या पिकाचे तसेच भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी बाजरी काढून पडली होती तर काही ठिकाणची बाजरी काढून कणसे मोडून ठेवली होती. पितृपक्ष असल्याने भाजीपाल्यांना मोठ्या प्रमाणात बाजारभाव आहे. मात्र सलग तीन दिवस होत असलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांचेही मोठे नुकसान झाले आहे.