कौतुकास्पद ! बीडच्या छोटया गावातील ‘या’ तरूणीचं नाव का घेतलं गेलं UN च्या रिपोर्टमध्ये ?, जाणून घ्या

मुंबई : पोलसीनामा ऑनलाइन – संयुक्त राष्ट्र संघाकडून नुकतेच जागतिक लोकसंख्या रिपोर्ट 2020 जारी करण्यात आला. यामध्ये जगभरात बालविवाह होण्याचे प्रमाण 21 टक्के असल्याचे सांगत चिंता व्यक्त करण्यात आली. जगभरात प्रत्येक पाच मुलींमागे एका मुलीचे लग्न 18 वर्ष पूर्ण होण्यापुर्वीच केले जात आहे. यूएनचा हा रिपोर्ट भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. देशात प्रत्येक 4 मुलींपैकी एका मुलीचा विवाह 18 वर्ष पूर्ण होण्यापुर्वीच केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

भारतातील राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2015-16 च्या आकडेवारीनुसार हा रिपोर्ट आहे. यामध्ये भारतीय महिलांचे कौतुक करण्यात आले आहे. ज्यांनी बालविवाहासारख्या प्रथेविरोधात हिंमतीने आवाज उठवला, शिक्षणाच्या जोरावर या महिलांनी आत्मनिर्भर होऊन आपल्या जगण्याचा मार्ग शोधला आहे. या अहवालामध्ये बीड जिल्ह्यात राहणाऱ्या सोनी या मुलीचा उल्लेख करण्यात आला आहे.

सोनीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर असतात. सोनिने तिचा अनुभव सांगताना म्हटले की, मी जेव्हा 15 वर्षाची होते त्यावेळी माझ्या काकांनी 28 वर्षाच्या युवकासोबत माझं लग्न ठरवलं. त्यावेळी मी लहान होते आणि कोणतीही जबाबदारी उचलू शकत नव्हते. दुष्काळामुळे अनेकजणांना कामासाठी दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतरीत व्हावे लागत होते. या ठिकाणी फक्त पती-पत्नीलाच काम मिळते. त्यामुळे त्यांच्या मुलांना त्रास सहन करावा लागतो. यामध्ये सर्वाधिक त्रास मुलींना होते, यामुळे मुलींची लवकर लग्न करून तिला अधिक सुरक्षित करण्याचा नातेवाईक प्रयत्न करतात.

परंतु सोनीची कहाणी वेगळी आहे. शारीरिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी तिचे लग्न लावून देण्यात आले. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच तिच्या पतीने आणि सासरच्या लोकांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. मी मनात जे काही असेल ते बिनधास्त बोलायची, त्यामुळे मी वाईट आहे असं वाटत होते. त्यांनी अनेकवेळा मला तांत्रिकाकडे नेले, भूत पळवण्याच्या नावाखाली मारहाण केली. त्यावेळी सोनीच्या घरच्यांनी तिची साथ दिली नाही. सोनीने तिचा हा सगळा अनुभव 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय बाल दिनाच्या कार्यक्रमात सर्वांसमोर बोलून दाखवला.

यानंतर सोनीने मागासवर्गीय महिला विकास मंडळ संस्थेच्या मदतीने कौशल्य विकासांतर्गत नर्सचं प्रशिक्षण घेतलं. एवढेच नाही तर तिने गावातील 12 मुलींना देखील या उपक्रमात सहभागी करून घेतले. सध्या सोनी पूर्णपणे आत्मनिर्भर असून पुण्यातील एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. तसेच ती समाजातील भेदभाव, मुलींवरील अन्यायासाठी जनजागृती निर्माण करत आहे. त्याचसोबत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते आणि कमाईच्या बळावर स्वत:चं भवितव्य सुरक्षित केले आहे.