कर्ज देण्याच्या बहाण्याने सव्वा लाखाला गंडा

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – फायनान्स कंपनीमधून बोलत असल्याचे सांगत एका व्यक्तीला कर्ज देण्याच्या बहाण्याने सव्वा लाखाला गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी चंद्रशेखर पत्ती (वय 55, रा. लष्कर) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका खासगी कंपनीत नोकरीस आहेत. दरम्यान, त्यांना डिसेंबर महिन्यात एका व्यक्तीचा फोन आला. त्याने फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखविले. परंतु, त्यासाठी काही पैसे लागतील असे सांगत त्यांच्याकडून 1 लाख 22 हजार रुपये उकळले. पैसे देऊनही त्यांना कर्ज मिळाले नाही. त्यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. तक्रार अर्जाची चौकशी करण्यात आल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास लष्कर पोलीस करत आहेत.