पुणे : बेकायदेशीर पिस्तुल बाळगणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – बेकायदेशीर पिस्तुल बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 1 पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुस जप्त केले आहेत.

नवनाथ उर्फ बापू बाबासाहेब शेलार (वय 34, रा. नांदोशी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिहंगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक संदीप साबळे यांनी फिर्याद दिली आहे.

शहरात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी तसेच पाहिजे आरोपी आणि सराईत गुन्हेगार यांची माहिती घेतली जात आहे. स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांना गस्त घालण्याच्या सूचना देत पकडण्यास सांगितले आहे. दरम्यान खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथक सराईताची माहिती घेत असताना पोलिस नाईक संदीप साबळे यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की, वडगाव धायरी भागात एकजण उभा असून त्याच्याजवळ पिस्तुल आहे.

त्यानुसार यामाहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक महाडीक, कर्मचारी संदीप साबळे व त्यांच्या पथकाने याठिकाणी सापळा रचून शेलार याला ताब्यात घेतले. त्याची आंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तुल व 2 काडतुसे मिळून आली.
शेलार याने पिस्तुल कुठून आणि कशासाठी आणले याबाबत तपास करण्यात येत आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अधिक तपास गुन्हे शाखा करत आहेत.