Pune : सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडीपार गुंडाचा राडा अन् दहशत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  सहकारनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात तडीपार गुंडाने येऊन एका व्यक्तीला मारहाण करत दहशत निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे.

ऋषिकेश ऊर्फ बारक्या संजय लोंढे (वय 20, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी प्रदीप शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातून लोंढे याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तरीही तो शुक्रवारी सकाळी सहकारनगर परिसरात आला. सुवर्ण मारुती मंदिर परिसरात तो कोयता हातात घेऊन रस्त्यावर फिरत होता. परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने पोलिसांसोबत झटापट करून त्यांना मारहाण केली. पोलिसांच्या कामात अडथळा आणला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी. गुजर करत आहेत. तडीपार गुंड दिवसाढवळ्या परिसरात येऊन दहशत माजवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर पोलिसांच्या कारभारावरदेखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.