Pune : काढलेले सेल्फी व्हायरल करण्याची धमकी देत 25 वर्षीय तरूणीला केले ब्लॅकमेल, 2 सख्ख्या भावांविरूध्द खंडणीचा FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दोन सख्ख्या भावंडानी मैत्रीणासोबत काढलेले सेल्फी सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करुन खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. कोथरुड परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी वैभव दिलीप कातोरे आणि रोशन दिलीप कातोरे (दोघे रा.ओंकारपुरम सोसायटी, कोथरुड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघा भावांची नावे आहेत. याबाबत कोथरुड पोलीस ठाण्यात २५ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी कोथरुड परिसरात राहण्यास आहे. ती आणि कातोरे भावंडे मुळचे नाशिकचे आहेत. शिक्षण घेत असताना नाशिकमध्येच २०११ मध्ये त्यांची कोचिंग क्लासमध्ये ओळख झाली होती. शिक्षणानंतर तरुणी नोकरीसाठी पुण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसानंतर वैभव आणि रोशनही पुण्यात वास्तव्यास आले. त्यानंतर त्यांनी तरुणीला वारंवार फोन करून लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली. तरुणीच्या कंपनीमध्ये जाउन तेथील कर्मचाऱ्यांना दोघांनी दमबाजी करीत तरुणी बायको असून, तीच्याशी नीट वागायचे असा दम दिला. याच कालावधीत तरुणीचे कुटूूंबिय लग्न ठरवण्याचा प्रयत्न करीत होते.

वैभवला तरुणीच्या लग्नाबाबत समजले तेव्हा त्याने सेल्फी सोशल मिडीयावर अपलोड करून तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठविण्याची धमकी दिली. त्यानुसार दोघा भावडांनी तरुणीला ब्लॅकमेलिंग करत जबरदस्तीने साडेसात हजार रुपये पाठवण्यास सांगितले. रोशन याने तरुणीला फोन करून मी मोबाईलच्या दुकानात आलो असून, वैभवला फोन घ्यायचा आहे असे सांगून धमकी देत १४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल घेऊन देण्यास भाग पाडले. वैभव हा तरुणीकडे एकतर्फी प्रेमातून सतत लग्न करण्यासाठी तगादा लावत होता. मात्र तरुणी त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार देत होती. यातूनच त्यांनी तरुणीला त्रास दिला. त्यामुळे तरुणीने कंटाळून पोलिसात धाव घेतली. अधिक तपास पोलीस निरीक्षक किरण बालवडकर करत आहेत.