Pune : ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी महापालिकेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र, महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या गरिब कुटुंबातील आणि यंदाच्यावर्षी दहावीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना मोबाईल व अन्य कुठलिच व्यवस्था नसल्याने त्यांना टॅब पुरवावेत, असा प्रस्ताव आज स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीमध्ये मंजुर करण्यात आला.

नगरसेवक राजेंद्र शिळीमकर आणि आमदार सुनिल कांबळे यांनी हा प्रस्ताव मांडला होता. कोरोनामुळे सध्या सर्वच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. महापालिकेच्या शाळेमध्ये गरिब कुटुंबातील विद्यार्थी आहेत. अनेकांना मोबाईल, टॅब अथवा संगणकाची सुविधा नसल्याने त्यांना ज्ञानार्जनापासून वंचित राहावे लागत आहे. महापालिकेच्या शाळेतील जवळपास १,१५० विद्यार्थी यंदा दहावीच्या वर्गात आहेत. तसेच आठवी व नववीतील विद्यार्थ्यांची संख्याही अडीच हजारांच्या आसपास आहे.

या विद्यार्द्यांना महापालिकेच्या माध्यमातून टॅब उपलब्ध करून दिल्यास अभ्यासात मदत होणार आहे. त्यामुळे टॅब पुरविण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती नगरसेवक राजेंद्र शिळीमकर यांनी दिली.