Pune : पंचवटी ते सेनापती बापट रोड व पौड रोड भुयारी मार्गास संरक्षण खात्याची मंजुरी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पंचवटी, पाषाण ते सेनापती बापट रोड व पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणासाठी संरक्षण खात्याची मंजुरी आज (शुक्रवारी) मिळाली आहे. अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

पंचवटी ते सेनापती बापट रोड व पौड रोड भुयारी मार्गाचे काम गतीने होण्यासाठी त्याचे सर्वेक्षण होणे गरजेचे होते. या कामाकरिता संरक्षण खात्याची (डीआरडीओ) मंजुरी आवश्यक होती. या विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आमदार शिरोळे यांनी गेल्याच आठवड्यात बैठक घेतली होती आणि या सर्वेक्षणाच्या कामाला मंजुरी द्यावी अशी मागणी केली होती. त्यावर बैठकीत विचारविनिमय झाला आणि लवकरच आम्ही सर्वेक्षणाला मंजुरी देऊ असे आश्वासन अधिकाऱ्यांनी आमदार शिरोळे यांना दिले होते. त्यानुसार आज मंजुरी मिळाली असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

या मंजुरीमुळे भुयारी मार्गाच्या कामाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया आमदार शिरोळे यांनी व्यक्त केली.

भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणाच्या कामाला गतीने सुरुवात करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवारी) झालेल्या आढावा बैठकीत देण्यात आले आहेत. याच बैठकीत पुणे मेट्रो मार्गिका क्रमांक तीन- शिवाजीनगर ते हिंजवडी या कामाला गती देण्यासाठी प्रकल्प निश्चिती, मान्यता, भूसंपादन, पर्यायी रस्ते आदींबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच पुणे महापालिका आणि पीएमआरडीएमधील अप्पर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती गठीत करण्याचा निर्णय झाला, असेही आमदार शिरोळे यांनी सांगितले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like