Coronavirus : सरकारच्या नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करा, पुणे पोलिसांचे नागरिकांना आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने राज्यात संचारबंदी लागू केली आहे. तसेच अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. राज्यात जमावबंदी असताना देखील नागरिक रस्त्यावर गर्दी करत असल्याने राज्य सरकारने राज्यात कलम 144 लागू केले आहे. असे असताना आज पुण्यात अनेक नागरिक पडल्याने पुणे पोलीस आयुक्तांनी शहरात वाहतूक बंदीचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी तीन पासून या नियमाची अंमलबजावणी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.

पुणे पोलीस आयुक्तांनी दुपारी 3 नंतर रस्त्यावर कोणतेही वाहन आणण्यास बंदी घातली आहे. राज्यासह शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. आयुक्तांच्या आदेशानंतर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तरी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी सरकारच्या नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी केले आहे.

पोलीस आयुक्तांनी दुपारी तीन नंतर पुणे शहरात वाहनांना बंदी घातली आहे. दुपारी तिननंतर विविध ठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली. त्यात सर्वच वाहनांची तपासणी करण्यात आली. अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यां वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, 31 मार्चपर्यंत ही वाहतूक बंदी शहरात लागू करण्यात आली असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये. जिवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठीच बाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडू नये असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.