पुण्यात नजर चुकवून दिला बाप्पाला नदीपात्रात निरोप !

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शहरातील गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. अशात आज दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात झाली आहे. महानगरपालिका आणि पोलिसांच्या आवाहनुसार नागरिकांनी घरातच विसर्जन करण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे नदी पाञात विसर्जनाला बंदी घातली आहे. तरीही काही लोक नजर चुकवून थेट नदी पाञातच मूर्ती विसर्जन करताना दिसत आहेत.

दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरवर्षी नदीपाञात पालिकेच्यावतीने विसर्जन हौद बांधले जातात. पण यंदा ती पण सोय नसल्याने नागरिक गुपचूपरित्या विसर्जन करीत असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे दीड दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी पुणे मनपाने 30 फिरते हौद तयार केले आहेत. दरम्यान, शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्यावर भर द्यावा, असे आवाहनी त्यांनी नागरिकांना केले आहे.