Pune : ‘कोरोना’ महामारीच्या काळात विरमरण आलेल्या पोलिसांच्या कुटुंबिंयाना शासनाच्या ‘सानुग्रह’ अनुदानातून 50 लाखांची मदत, पोलिस आयुक्तांकडून धनादेश ‘सुपूर्द’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीच्या काळात पोलीस दल 24 तास ऑन ड्युटी कर्तव्य बजावत असताना कोव्हीडचा संसर्ग होऊन विरमरण आलेल्या पुणे पोलीस दलातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते शासनाच्या “सानुग्रह”अनुदानातून 50 लाख रुपयांची मदत केली आहे. त्याचा धनादेश आज देण्यात आला.

जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला. संसर्गाचा प्रसार थांबविण्यासाठी पोलीस दल 24 तास ऑन ड्युटी होते. रस्त्यावर उतरून या काळात पोलीस दलाने काम केले. पण कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली. देशात सर्वाधिक बाधित जिल्हा म्हणून पुणे होते. पण तरीही पोलिसांनी कठीण काळात उत्कृष्टरित्या काम केले. मात्र शहर पोलीस दलातील जवळपास 1 हजार 336 जणांना कोरोनाची लागण या काळात झाली. त्यात 8 जणांना वीरमरण आले. तर अद्याप देखील 40 कर्मचारी उपचार घेत आहेत. इतर कर्मचारी हे पुन्हा ड्युटीवर हजर होत काम करत आहेत.

कोरोना लढ्यात मृत्यू झाल्यास त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला राज्य शासनाकडून सानुग्रह अंतर्गत 50 लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार पुण्यातील 3 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आज पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला आहे. यावेळी सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. जालिंदर सुपेकर, डॉ. संजय शिंदे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वाहतूक शाखेतील सहाय्यक उपनिरीक्षक 56 वर्षीय सुरेश दळवी, वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विनोद पोतदार (वय 51) आणि विशेष शाखेत कर्तव्यास असलेले सहायक उपनिरीक्षक भगवान निकम (वय 55) यांच्या कुटुंबाला ही मदत मिळाली आहे. यापूर्वी दोघांना आर्थिक मदत मिळाली आहे. तर दोघांना हा लाभ मिळालेला नाही. त्यात ते दोघे संसर्ग झाला त्या दिवसा अगोदरपासून 14 दिवस रजेवर होते. यामुळे त्यांना ही मदत मिळू शकलेली नसल्याचे सांगण्यात आले.