धक्कादायक ! पुण्यातील पत्रकार अन् त्याच्या पत्नीला पोलिसांकडून अटक, लॉकडाऊनमध्ये अवैधरित्या दारूची विक्री

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  हडपसर भागातील एका युट्युब चॅनेलचा पत्रकार आणि त्याची वकील पत्नी अवैधरित्या दारू विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी राहुल मच्छिंद्र हरपळे (वय 33), सुचिता राहुल हरपळे (वय 30, रा. चंदवाडी, फुरसुंगी, हडपसर) आणि राहुल याचे आई-वडील अश्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उपनिरीक्षक रविंद्र ढावरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल याचे युट्यूब चॅनेल आहे. तो स्वतः पत्रकार असल्याचे सांगतो. तर त्याची पत्नी वकील आहे. दरम्यान हरपळे यांनी हातभट्टी दारूचा साठाकरून ठेवला असून ती त्याची विक्री करत असल्याची माहिती हडपसर पोलीसांना मिळाली. त्यानुसार या माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता त्यांच्याकडे हातभट्टी दारूचे कॅड मिळून आले. त्यांच्याकडून 12 हजार 700 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान पोलीस कारवाई करण्यास गेल्यानंतर राहुल हा पोलिसांना मी पत्रकार आहे. तर सुचिता ही मी वकिल आहे. तुमच्याबाबत वरिष्ठांना तक्रारकरून कारवाई करायला लावतो असे म्हणू धमकावल्याचे देखील या फिर्यादीत म्हटले आहे.

त्यावेळी पोलिसांनी त्या चौघांना देखील ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच त्यांना अटक करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.