पुण्यात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार ‘हजेरी’

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना, लॉकडाऊन आणि उन्हाळ्याचा उकाडा.. .या सर्व गोष्टी एकाच वेळी उभ्या ठाकल्या आहेत. मात्र, रविवारी सायंकाळी ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाचे थेंब पडले. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि विजांच्या लखलखाटात वरुणराजा जोरदार बरसला. मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

रविवारी मध्यरात्री सुरू झालेला पाऊस सोमवारी पहाटेपर्यंत सुरू होता. अनेकांनी मध्यरात्रीसुद्धा पावसाच्या टपोऱ्या थेंबाचा आस्वाद घेतला.

हडपसर आणि परिरात पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे इमारतींच्या टेरेस, पत्र्याच्या छतावरून आणि रस्त्यावरून धोधो पाणी वाहत होते. झाडांची पानेही स्वच्छ धुवून निघाली. वारा नसल्यामुळे पाऊस बराच वेळ रेंगाळला होता. आज (सोमवार) भल्या सकाळपासून ढगाळ वातावरण होते. कोकिळासुद्धा छान गात होती. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. वातावरणामध्ये बदल झाल्याने नागरिकांनी पहिल्यावहिल्या जोराच्या पावसाचे जल्लोषात स्वागत केले.

राज्यातील काही भागांमध्ये पावसाची सुरुवात झालेली आहे. सोमवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला. रविवारी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. तर सोमवारी पहाटे मुंबई, पुण्यात पावसाचं आगमन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे रविवारी रात्री राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. परभणी, कोल्हापूर आणि साताऱ्यात मुसळधार पाऊस बरसला आहे. तर पिंपरी-चिंचवड परिसरात पावसाच्या तुरळक सरी जाणवल्या. सांगली जिल्ह्यात आज पहाटेपासून संततधार सुरू आहे. तर कोकणसह मुंबई आणि ठाण्यात तीन ते पाच जूनदरम्यान पावसाचं आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून, सर्वत्र रात्रभर संततधार पाऊस सुरू होता. शिवाय पहाटेपासून अधून मधून पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत. यामुळे शहर आणि जिल्हावासीयांना उकाड्यापासून मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. रात्री अनेक जिल्ह्यातील तालुक्यात जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. पहिल्याच पावसाने दमदार हजेरी लावल्याने मागच्या महिनाभरापासून जाणवणाऱ्या उकड्यापासून मात्र जिल्हावासीयांची मुक्तता झाली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like