Pune : महापालिकेच्या ‘अकार्यक्षम’ अधिकारी व कर्मचार्‍यांना सेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त केले जाणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   महापालिकेच्या सेवेतील ५० ते ५५ वर्ष वयापुढील किंवा सेवेची ३० वर्षे पुर्ण झालेल्या अधिकारी आणि अन्य कर्मचार्‍यांच्या पात्रपात्रता आणि कार्यक्षमतेचे पुनर्विलोकन करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. महापालिकेच्या सर्व विभागांनी येत्या ३१ मार्चपर्यंत पुनर्विलोकनासाठी पात्र ठरणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांचे अहवाल या समितीकडे सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले आहेत. अकार्यक्षम व सचोटीमध्ये अपात्र ठरणारे आणि अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाची पालिका स्तरावर अंमलबजावणी करण्यात येणार असून यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

अकार्यक्षम तसेच विविध कारणास्तव अपात्र ठरलेल्या ५० ते ५५ वर्ष वयापुढील किंवा सेवेची ३० वर्षे पुर्ण केली आहे, अशा कर्मचार्‍यांची पात्रपात्रतेचे पुनर्विलोकन करून यामध्ये अपात्र ठरणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांना मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. या धोरणाच्या अनुषंगाने पुणे महापालिकेनेही ५० ते ५५ वर्ष वय असलेले किंवा महापालिकेतील ३० वर्षे पुर्ण केलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पात्रतेबाबत पुनर्विलोकन करण्याचा निर्णय घेतला आहे. या वयोगटातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या पात्रतेचे पुनर्विलोकन करण्यासाठी समिती नेमली आहे. अ वर्ग अधिकार्‍यांच्या पुनर्विलोकनासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दोन उपायुक्तांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली आहे. तर ब, क व ड वर्गातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पात्रता पुनर्विलोकनासाठी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. येत्या ३१ मार्च पर्यंत पुनर्विलोकनास पात्र ठरणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांचे अहवाल विस्तृतपणे समितीकडे सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.