पुणेकरांसाठी खुशखबर ! पुढील आठवड्यात PMPML बस सेवा सुरु करण्यास तत्वतः मान्यता

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊन काळात पुण्यातील पीएमपीएमएल बस सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. आता अनलॉकमध्ये जनजीवन हळूहळू पूर्ववत होत आहे. लॉकडाऊनमुळे बेजार झालेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील आठवड्यापासून पीएमपीएमएल बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. तब्बल पाच महिन्यानंतर पीएमपीएमएल रस्त्यावर धावणार आहे. पुढील आठवड्यात 22 तारखेला गणेश चतुर्थीला पीएमपीएमएलचा श्री गणेशा होण्याची शक्यता आहे.

दोन्ही शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु करण्याचा निर्णय पीएमपीएमएल प्रशासनाने घेतला आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे पीएमपीएमएल प्रशासनाने बस सेवा सुरु करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे.त्यामुळे 22 तारखेला गणेश चतुर्थीला पीएमपीएमएलचा श्री गणेशा होण्याची शक्यता आहे. पाच महिने बस सेवा बंद असल्याने PMPML ला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार देणे, देखभाल दुरुस्तीचा खर्च अवाक्याबाहेर गेला आहे. PMPML ला साधारणपणे प्रतिदिन दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते.

ADV

मात्र, कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मिळणारे उत्पन्न बंद झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला. PMPML ला आतापर्यंत 200 कोटी रुपयांचा आर्थिक फटला बसला आहे. यासंदर्भात सोमवारी पुणे आणि मंगळवारी चिंचवड महानगरपालिका आयुक्त आणि पीएमपीएमएल प्रशासनाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये पहिल्या टप्प्यात 400 ते 500 बसेस शहरात सुरु होतील. मात्र, ही बस सेवा कोरोना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरच सुरु होणार आहे. नागरिकांच्या प्रतिसादानंतर संपूर्ण शहरात PMPML सेवा सुरु होणार आहे. यामुळे दोन्ही शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.