… तरीही पुणे पोलिसांकडून 7 हजार जण बंदोबस्तासाठी तैनात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असून, यंदा गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. तरीही पुणे पोलिसांनी 7 हजार पोलिसांचा ताफा रस्त्यावर तैनात राहणार आहे. नागरिकांनी स्वयं शिस्त पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पुणे पोलीसांनी केले आहे. पोलीस आयुक्त कार्यालयात आज पत्रकार परिषदेत पुणे पोलिसांनी याची माहिती दिली. कोरोनाचा संसर्ग सध्या काही प्रमाणात आटोक्यात आला आहे. पण, नागरिक उत्सवासाठी बाहेर पडल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे यंदा श्रींच्या आगमन व विसर्जनाच्या मिरवणूका निघणार नाहीत. तसेच मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

६० ते ७० टक्के मंडळांनी मंदिरातच गणेश उत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. ज्या मंडळांना मंदिर नाहीत, त्यांना छोटे मंडळ उभे करण्यास परवानगी दिली आहे. उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार असला तरी पोलिसांचा बंदोबस्त दरवर्षीप्रमाणेच असणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विशेष काळजीही घेतली जाणार आहे. पहिल्या दिवशी गर्दी होऊ नये म्हणून बंदोबस्त राहणार आहे. तसेच, घरगुती गणपतीचे सोसायटीत विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही नागरिकांनी बाहेर पडू नये त्यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गणेश उत्सवासाठीच्या बंदोबस्तामध्ये सुमारे 7 हजार पोलिस कर्मचारी, 700 अधिकारी व राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्यांचा समावेश आहे.

गुन्हे शाखा व विशेष शाखेची पथके
गणेश उत्सवात गुन्हे घडू नये यासाठी गुन्हे शाखेचा वेगळा बंदोबस्त असणार आहे. प्रत्येक झोननुसार गुन्हे शाखेची पथके तयार केली असून, या पथकामध्ये १०० कर्मचारी राहणार आहेत. त्याबरोबरच घातपात विरोधी कारवाईसाठी विशेष शाखेचा ही बंदोबस्त राहणार आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे. तसेच, वाहतूक पोलिसांकडून देखील बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

ध्वनीचित्रफितीचे आनावरण
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी गणेश उत्सवासाठी नागरिकांनी बाहेर पडू नये म्हणून पुणे पोलिस व महापालिका यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ध्वनिचित्रफितीचे आनावरन करण्यात आले. यावेळी यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, युवा उद्योजग पुनीत बालन, सहआयुक्त रवींद्र शिसवे, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, विशेष शाखेचे उपायुक्त मितेश घट्टे उपस्थित होते. यावेळी महापौर मोहोळ म्हणाले, करोना संसर्गाचा धोका कायम आहे. आपण परिस्थिती नियंत्रणात आणत आहोत. आपण एवढे दिवस काळजी घेतली आहे. आणखी काही दिवस काळजी घेवूया त्यामुळे नागरिकांनी स्वंयशिस्तीने आणि घरीच गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले. डॉ. रवींद्र शिसवे म्हणाले, नामवंत कलावंतांना सोबत घेवून ध्वनीचित्रफित तयार केली आहे. त्याच्या मदतीने नागरिकांमध्ये प्रबोधन केले जात आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून उत्सव साजरा करावा, असे आवाहन केले.