पुणे पोलिसांकडून 4 लाख फूड पॅकेटचे वाटप, मदतीचे काम सुरूच…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या “सोशल पोलिसिंग सेल”च्या माध्यमातून शहरात तबल 4 लाख गरजू नागरिकांना फूड पॅकेट देण्यात आले आहेत. शहरातील दानशूर व्यक्ती, विविध संस्थानी दिलेल्या मदतीने यातून ही मदत दिली आहे. यात जेवणासह हॅण्ड सॅनिटायझर, मास्क, साबण, पाणी आदी गोळा करून वाटप करण्यात आले आहे.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी केेली आहे. नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई आहे. मात्र या कालावधीत अनेक मजूर, बेघर, परप्रांतीय कामगार, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी, बाहेर गावचे विद्यार्थी यांचे हाल सुरू झाले आहेत. शहरातील हॉटेल्स, मेस, खाणावळी बंद आहेत.

या कालावधीत सामाजिक संस्था व पुणे पोलिस मदत करत होते. पण, या कामाला एक सुसुत्रता हवी म्हणून पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सोशल पोलिसिंग सेल तयार केला. 7 एप्रिल रोजी हा सेल सूर केला. यातून 1 लाख ७२ हजार ३५४ फुड पाकिटे व अन्नधान्य किट गरजु लोकांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. तर, २५ मार्च ते ११ एप्रिलदरम्यान 3 लाख ९३ हजार ३५४ फुड पाकिटे व अन्नधान्य किट गरजु मजूर, बेघर, परप्रांतीय कामगार, तृतीय पंथीय, बाहेर गावचे विद्यार्थी, तसेच ससून हॉस्पीटल, कमला नेहरू हॉस्पीटल आदी विविध उपचारासाठी अ‍ॅडमिट असणारे रुग्णांचे नातेवाईक यांना देण्यात आली आहेत.

अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चन सिंह, सहाय्यक आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, अनिल पाटील, नियंत्रण कक्षाचे पोलिस निरीक्षक सुनिल दोरगे, संतोष सोनवणे यांच्यासह वाहतुक विभागातील २० कर्मचारी व पोलिस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी सोशल पोलिसिंग सेल अंतर्गत काम करणार आहेत.

मदत करण्याचे आवाहन

गरजू व्यक्तींना मदतीसाठी दानशूर नागरिकांनी पुढे येऊन मदत करावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. सकाळी दहा ते चार पर्यंत ८८०६८०६३०८ या क्रमांकावर आणि सायंकाळी 4 ते सकाळी 10 संबंधित पोलिस ठाण्यातील तपास पथकाच्या अधिकार्‍यांशी मदतीसाठी संपर्क साधवा.