Pune : मुठा नदीत वाहून जाणार्‍या दोघांना पोलिसांनी वाचवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुठा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या दोघांना उत्तमनगर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने वाचविले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. निताई मुकूल मिस्त्री (वय ३०), जॉय कालीपोती सरदार (वय २०, दोघेही- रा. हरेकृष्ण मंदीर, उत्तमनगर) अशी या दोघांची नाव आहे.

निताई मिस्त्री हे गुरूवारी सकाळी मुठा नदीत अंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा पाय घसरून ते नदीत पडले. त्यांना वाचविण्यासाठी सरदार यांनी पाण्यात उडी घेतली. पण, सध्या धरणक्षेत्रात पाऊस पडत असल्याने मुठा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह जास्त आहे. यात दोघेही वाहून जाऊ लागले. उत्तमनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी निलेश तनपुरे यांना शिवणे स्मशानभुमी येथे नेमले होते. त्यांना ही माहिती मिळताच त्यांनी नागरिकांच्या मदतीने दोर नदीत बांधला. त्याचवेळी एकजण वाहत येत असून तो पोहत असल्याचे दिसले.

नागरिकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दुसरी व्यक्ती देखील वाहत येताना दिसली. त्या व्यक्तीला त्यांनी नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तनपुरे यांना स्थानिक जीवरक्षक विश्वास गिरे, रितेश शिंदे, सनी दगडे, शाम ससाणे यांनी मदत केली. पोलीस व नागरिकाचे कौतुक होत आहे.