वॉकीटॉकी ‘गायब’ ! पुण्यातील पोलीस तडकाफडकी निलंबित

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस दलातील महत्त्वाचा भाग असणाऱ्या वॉकीटॉकी हरविणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. प्रतीक सुरेश गायकवाड (नेमणूक हडपसर पोलीस ठाणे) असे निलंबित करण्यात आलेल्या शिपायाचे नाव आहे. प्रतीक हडपसर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. यादरम्यान २१ ऑगस्टला त्यांना फुरसुंगी बीटमार्शलची ड्युटी लावण्यात आली होती. त्यावेळी पेट्रोलिंगवर असताना रात्री दहाच्या सुमारास प्रतीक यांच्याकडून वॉकीटॉकी हरविल्याची घटना घडली होती. त्याची तक्रार हडपसर पोलिस ठाण्यात देण्यात आली होती.

शासकीय मालमत्ता असलेली वॉकीटॉकी काळजीपूर्वक सांभाळण्याची जबाबदारी प्रतीक यांची होती. मात्र, कोणतीही खबरदारी न घेता प्रतीकने वॉकीटॉकी हरविली. संबंधित वॉकीटॉकी धोकादायक संघटनेच्या हाती लागल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होउ शकतो. त्यामुळे पोलीस खात्यात असतानाही प्रतीक यांचे वर्तन अशोभणीय असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानुसार त्यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिले आहेत.

ADV

वॉकीटॉकीची काळजी घेणे गरजेचेच शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षातून काम पाहिले जाते. त्यासाठी प्रत्येक बीट मार्शलांसह, दामिनी पथक, पोलीस ठाण्यांकडे असलेल्या वॉकीटॉकीचा मोठा आधार आहे. त्याद्वारेच गोपनीय संदेश देउन गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. मात्र, गस्तीवर असतानाही वॉकीटॉकीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून आले आहे. त्यातच हडपसर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने वॉकीटॉकीच हरविल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.