पुणे : सार्वजनिक स्वच्छतागृहांना बाहेरून ‘रंगरंगोटी’ अन् आतमध्ये दुरावस्था, भाजप नगरसेविकेकडून ‘स्वच्छ शहर’ अभियानाचा ‘पर्दाफाश’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राबविण्यात येणार्‍या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी महापालिका राबवित असलेल्या उपक्रमांचा सत्ताधारी भाजपच्याच नगरसेवकांनी पर्दाफाश केला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेसाठी स्वच्छतागृहांची रंगरंगोटी केली जातेय, मात्र स्वच्छतागृहांच्या आतमधील परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहर स्वच्छता अभियान देशपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान सुरू असून शहर स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पातळीवर स्पर्धाही घेण्यात येत आहे. या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत मागील वर्षी मागे पडलेल्या पुणे महापालिकेने यंदाच्यावर्षी जोरदार तयारी केली आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरूस्ती व रंगरंगोटीची कामे हाती घेण्यात आली आहेत.

परंतू स्वच्छतागृहांची ही रंगरंगोटी केवळ दिखावा असल्याचे भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी उघडकीस आणली आहे. त्यांनी शहरातील काही भागातील स्वच्छतागृहांची पाहाणी केली. केवळ बाहेरून रंगरंगोटी करून सुशोभित आणि टापटीप करण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची आतील भागाची अवस्था अत्यंत वाईट आहे. याठिकाणी स्वच्छतेअभावी मोठ्याप्रमाणावर घाणीचे साम्राज्य आहे. महिलांसाठी बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांचीही अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे महिलाही त्याचा वापर करत नाहीत.

एकीकडे रस्त्यावरचे डिव्हाडर धुवून त्यांना रंगरंगोटी केली जात असताना स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने त्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. महापालिका आयुक्तांना निवेदन देउन केवळ स्पर्धेतील दिखाव्यापुरते काम करण्याऐवजी पंतप्रधानांना अपेक्षित आरोग्यपुर्ण सेवेसाठी प्रशासनाने प्रयत्न करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/