पुणे जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकाचा खून,असा झाला पर्दाफाश

घोडेगाव/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आंबेगांव तालुक्यातील लांडेवाडी-पिंगळवाडी येथील सुदाम विठ्ठल लांडे (वय-60) यांना लोखंडी हातोड्याने मारहाण करू अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोकड काढून घेऊन त्यांचा खून केल्याच्या आरोपांवरून दोन जणांविरोधात घोडेगांव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तर एकजण फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली. सुदाम लांडे हे बेपत्ता झाल्याची तक्रार घोडेगांव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत लांडेवाडीच्या अंगवाडीजवळील कालव्याजवळ 22 जुन रोजी आढळून आला होता.

मात्र, हे ठिकाण मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. संबंधित व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू असल्याने त्याअनुषंगाने उपिभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे आणि मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केला. तसेच सुदाम लांडे यांच्या मुलाने, माझ्या वडिलांचा खून झाला असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करावा अशी मागणी केली होती. त्यादृष्टीने पोलिसांनी केलेल्या तपासात लांडेवाडी अंगणवाडी गावच्या हद्दीत डिंभे उजवे कालव्याजवळ जंगलात विकी सुरेश एरंडे (रा. हुलेस्थळ, नारोडी), ऋषिकेश रमेश मोरे (रा. नारोडी) या दोघांनी सुदाम लांडे यांना दुचाकीवर जबरदस्तीने बसवून घेऊन जाऊन लोखंडी हातोड्याने मारहाण करून खून केला.

तसेच त्यांच्या अंगावरील दोन तोळ्याची सोन्याची चैन आणि रोकड काढून घेत मृतदेह कालव्याच्या पाण्यात टाकून दिल्याचे तपासात उघडकीस आले. हा गुन्हा मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने घोडेगांव पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. ऋषिकेश रमेश मोरे याला घोडेगांव पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला 18 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर विकी एरंडे याच्या मागावर पोलिसांचे पथक असून त्याला लवकच अटक करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.