Pune : दगडूशेठ गणपती मंदिरात उमांगमलज जन्मोत्सव साजरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   दगडूशेठ गणपती मंदिरात श्री उमांगमलज जन्मोत्सव कार्तिक शुद्ध चतुर्थीला (बुधवारी) माध्यान्हीच्या वेळी दुपारी बारा वाजता विधिवत साजरा झाला. ब्रह्मणस्पती सूक्तानी या धार्मिक सोहळ्याचा प्रारंभ झाला. महाआरती करण्यात आली. त्याचप्रमाणे मंदिरात गणेशयागही करण्यात आला. याप्रसंगी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे, उपाध्यक्ष सुनीलजी रासने, कोशाध्यक्ष महेशराव सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, तसेच राजेंद्र चिंचोरकर आदी उपस्थित होते.

भगवान श्री गणेश यांच्या विविध अवतारांमधील उमांगमलज हा अवतार वैभवशाली मानला जातो. गाणपत्य संप्रदायात या दिवशी मोरयाला नारळ समर्पित करण्याला महत्त्व आहे. नारळालाही बुद्धीचे प्रतीक मानले जाते. याकरिता गणरायाला नारळ अर्पण करण्यात आले. तसेच सुमनाचे प्रतीक म्हणून नारळासोबतच फुलेही अर्पण करण्यात आली. उमांगमलज जन्मोत्सवाचे निमित्त साधून ट्रस्टच्या कोंढवा येथील पिताश्री वृद्धाश्रमाच्या आवारात शमी आणि मंदार या धार्मिकदृष्ट्या पवित्र वृक्षांचे रोपण करण्यात आले.

भगवान श्री गणेशाचे विविध अवतार झाले. त्यातील ‘उमांगमलज’ हा एक अवतार असून, उमेच्या म्हणजे देवी पार्वतीच्या उमांगमल (उमेच्या अंगावरील मळापासून) आणि ज म्हणजे जन्माला आलेला असा त्याचा शब्दशः अर्थ. पण, भावार्थ असा की आपली बुद्धी हीच देवी पार्वती आहे. तिच्यावर चढलेला अहंकाराचा मळ दूर झाला की, ज्या गणेशाची प्राप्ती होते त्याला उमांगमलज म्हणतात.