Pune : पोलीस निरीक्षकाचा ‘बर्थडे’ जोमात ! ‘प्रत्यक्ष’ भेटून शुभेच्छा देणारे ‘कोमात’, अनेकांची ‘घालमेल’ सुरु आसल्यानं प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षकांच्या बर्थडे’मुळे शहरात खळबळ उडाली आहे. बर्थडेच्या पार्टीनंतर ते स्वतः ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे पुणे पोलीस दलात चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकतीच त्यांची पोलीस ठाण्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. झोन 3 मधील आणि कायम चर्चेत असणाऱ्या ‘या’ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांचा वाढदिवस बुधवारी साजरा झाला. आता ठाण्याच्या निरीक्षकांचा ‘बर्थडे’ म्हणलं की हद्दीतल्या सर्वच ‘माननीय’ ठाण्याला भेट देऊन मोठं मोठी पुष्पगुच्छ घेऊन येतात आणि ‘शुभेच्छा’ देतात.

पोलीस स्टेशन म्हणजे सर्वांना महत्वाचे वाटते. तस ‘या’ पोलीस ठाण्याचा पदभार मिळविण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावावी लागते. मात्र, आयुक्त डॉ. वेंकटेशम यांनी फिल्डिंग लावणाऱ्यांना बाजूला ठेवून प्रामाणिक काम व निष्ठा असणाऱ्या अधिकाऱ्याना प्राधान्य दिले आहे. नुकतीच ‘या’ वरिष्ठ निरीक्षकांची संबंधित पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. नवीन साहेब आणि त्यात वाढदिवस म्हणल्यानंतर गाठी-भेटी होणारच. बुधवारी देखील तेच झाले. कोरोना काळातही त्यांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी हद्दीतील मान्यवर व साहेबांच्या मित्रमंडळींची देखील रिघ लागली होती. यावेळी भेटवस्तू, केक व पेढा भरवतानाचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.

मात्र, हा वाढदिवस आता सर्वांच्या मनाची घालमेल करत आहे. कारण साहेबांचा शुक्रवारी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही माहिती वाऱ्या सारखी सर्वत्र पसरली आणि त्यांची घालमेल सुरू झाली आहे. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी दिवसभरात व या आठवड्यात त्यांना भेटलेल्या नागरीक व पोलिसांत खळबळ उडाली आहे. आता स्वत:हुन साहेबांना भेटणारे माननीय व्यक्तींनी आपली कोरोना चाचणी करून घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करत आहेत.

तर दुसरीकडे वाढदिवस सोडाच पण 5 पेक्षा जास्त लोक एकत्र आल्यानंतर त्यांना पोलीस कारवाईचा दंडुक फिरवत आहेत. पण या महामारीत पोलीस निरीक्षकांचा बर्थडे पुणेकरांत चर्चेचा विषय झाला आहे. ज्यांनी कायदा व व्यवस्था सांभाळायचा तेच असे करत असल्यास कसे होणार असे देखील नागरिक बोलू लागले आहेत.धक्कादायक म्हणजे, याच पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) महिनाभरापासून कोरोनाने घरी आहेत. त्यामुळे आता वरिष्ठांना ‘या’ पोलीस ठाण्याला तात्पुरते अधिकारी द्यावे लागणार आहेत.