राहुल गांधी ना आपल्यांचे झाले, ना परक्यांचे : स्मृती इराणी

अमेठी : वृत्तसंस्था – राहुल गांधी ना आपल्यांचे झाले, ना परक्यांचे त्यांच्यासोबत असलेल्या ममता बॅनर्जी त्यांना महत्व देत नाहीत तर दुसरीकडे ज्याच्यासोबत त्यांनी सत्ता उपभोगली त्या डाव्यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला असे म्हणत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल यांच्यावर निशाणा साधला आहे. अमेठी येथील प्रचार दौऱ्यादरम्याने त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

राहुल यांनी आज वायनाडमधून आपला उमेदवारी अर्ज भरला. तसेच ते अमेठी येथूनही निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यांच्याविरोधात भाजपकडून स्मृती इराणी दोन हात करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर इराणी यांनी राहुल यांना लक्ष करत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

आपल्या प्रचारादरम्यान इराणी म्हणाल्या की, ‘महाआघाडीनं त्यांची साथ सोडली. ममताजी त्यांना महत्त्व देत नाहीत. डाव्यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला, ज्यांच्यासोबत त्यांनी सत्तासुख भोगलं, ते सर्वच आज राहुल गांधींपासून दूर गेले आहेत. राहुल गांधी ना आपल्यांचे झाले, ना परक्यांचे,’ राहुल यांनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरून अमेठीतील जनतेचा अपमान केल्याचं इराणी म्हणाल्या. तर राहुल गांधी अमेठीत अपयशी ठरल्यानंतर आता वायनाडमधील जनतेला फसवण्यासाठी जात आहेत. त्यांना अमेठीचा विकास करता आला नाही. इथल्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आम्ही सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना मदत दिली. मात्र, राहुल यांनी १५ वर्षे शेतकऱ्यांसाठी काहीच केलं नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली.