सावरकरांच्या विधानामुळे महाविकास आघाडीला फटका ? अजित पवारांनी दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वादावरून काँग्रेस आणि शिवसेनेत शीतयुद्ध सुरु झाले आहे. भाजपकडून या शितयुद्धाचा फायदा उठवला जात असून भाजपकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस विचारांना विरोध करणाऱ्या शिवसेनेला कोंडीत पकडण्याचं काम भाजप नेत्यांकडून सुरु आहे. राहुल गांधींनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांनी शिवसेनेला लक्ष केले आहे. यावर अजित पवारांनी आपले मत व्यक्त केले आहे.

मराठी बाणा सांगणारी शिवसेना सत्तेसाठी काँग्रेसपुढे लाचार झाल्याची टीका भाजपनेते आशिष शेलार यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे देशाचे राजकारण तापले आहे. राहुल गांधी याच्यावर अनेकांकडून टीका केली जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांनी राहुल गांधी यांच्यावर ट्विच्या माध्यमातून टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. भाजपकडून होणाऱ्या हल्ल्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

राहुल गांधींनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावरकरांच्या विधानाबाबतच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. तर राष्ट्रवादीचे नते अजित पवार यांनी सावध भूमिका घेतल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीत फूट पडण्यासाठी काहीजण देव पाण्यात बुडवून वाट पहात आहेत. पण, शरद पवार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मोठे जाणकार आणि प्रगल्भ नेते आहेत. त्यामुळे, ते योग्यपणे आपली भूमिका घेतील, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/