राजस्थानमध्ये काँग्रेसविरोधात मतदान करा, बसपाने काढला ‘व्हिप’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राजस्थानातील सत्ता संघर्षात उच्च न्यायालयाचा निर्णय अद्याप प्रलंबित असतानाच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. बहुजन समाज पक्षाने थेट काँग्रेसविरोधात भूमिका घेतली असून, विश्वासदर्शक ठरावावेळी विरोधात मतदान करण्याचे आदेश आमदारांना दिले आहेत.
राजस्थान मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेला सत्ता संघर्ष नव्या वळणावर येऊन ठेपला आहे.

बंड केलेल्या सचिन पायलट यांनी अद्यापही माघार घेतली नसून, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अधिवेशन बोलावण्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. गेहलोत यांनी यासंदर्भात थेट राष्ट्रपतींची भेट घेण्याचा तसेच पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्याचाही इशारा दिला आहे. या सगळ्या घटना घडत असताना बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी राजस्थानात काँग्रेस विरोधात विरोधात भूमिका घेतली आहे.

गेहलोत यांनी अधिवेशन घेण्याच्या मागणीवर जोर दिल्यानंतर काँग्रेस बहुमत सिद्ध करण्याचा ठराव मांडणार असल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाने तातडीने व्हिप जारी केला आहे. राजस्थानात बसपाचे सहा आमदार असून, त्यांना विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काँग्रेस विरोधात मतदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आर. गुढा, लाखन सिंह, दीपचंद, जेएस अवाना, संदीप कुमार आणि वाजिब अली अशी बसपा आमदारांची नावे आहेत.