काँग्रेसनं हकालपट्टी करताच सचिन पायलट यांना भाजपची खुली ‘ऑफर’

लखनऊ : वृत्तसंस्था –   राजस्थानमध्ये राजकीय भूकंप झाला असून काँग्रेसने बंडखोर सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवले आहे. तसेच त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद देखील काढून घेण्यात आले आहे. सचिन पायलट यांच्यासोबत त्यांचे समर्थक तीन आमदारांची मंत्रीपद काढून घेण्यात आली आहेत. यावर लगेचच पायलट यांनाही पक्षाला उत्तर दिले. आता त्यांना थेट भाजपमध्ये येण्याची ऑफर मिळाली आहे.

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजच्या खासदार आणि राज्याच्या मंत्री रीटा बहुगुणा जोशी यांनी सचिन पायलट यांना भाजपात प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे. रीटा यांनी ट्विट करून ही ऑफर दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्य म्हटले आहे की, आणखी एका काँग्रेस नेत्याचा अपमान झाला आहे. सचिन यांनी देशहित लक्षात घेऊन भाजपमध्ये प्रवेश करायला हवा. राहुल गांधी याच्या वाईट वागणुकीचे आणखी एक उदाहरण, असे ट्विटमध्य जोशी यांनी म्हटले आहे.

यापूर्वी सचिन पायलट यांनी ट्विरवरील आपली काँग्रेसबाबतची माहिती बदलल्याने काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी खेद व्यक्त केला आहे. तसेच ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रतिभेला स्थान नसल्याची टीका करत पायलट यांचे समर्थन केले होते. पायलट यांनी काँग्रेसचा उल्लेख आणि फोटो काढल्यावरून जितिन यांनीही ट्विट केले आहे. सचिन पक्षातील सहकारीच नाहीत तर माझे मित्रही आहेत. पक्षासाठी त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही, अजूनही परिस्थिती सुधारू शकते अशी अशा आहे, मात्र स्थिती आता इथपर्यंत येऊन पोहचली आहे,असे जितिन यांनी म्हटले आहे.