राजस्थानचे सराईत गुन्हेगार वाकडमध्ये अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – खूना सारख्या गंभीर गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असणाऱ्या आणि राजस्थान पोलिसांचे बक्षीस असणाऱ्या सराईत तीन गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड खंडणी, दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे.लांडेवाडी, भोसरी येथे मोबाईल आणि पैसे चोरल्याच्या आरोपाखाली तिघांना वाकड येथील छत्रपती चौकातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी राजस्थान येथे खून केल्याची माहिती दिली.

जगदीश बीरबल राम जाखड (३७), अभिषेक गोपाल गौर (२४) आणि रजत सुभाष चौधरी (२१, सर्व रा. पुराणी आबादी, गंगानगर, राजस्थान) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, लांडेवाडी भोसरी येथे एका व्यक्तीचे मोबाईल आणि पैसे चोरीला गेले होते, त्याचा तपास सुरू असताना वाकड परिसरात संशयित तिघे आढळले. खंडणी व दरोडा विरोधी पथकाने या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली.

त्यावेळी त्यांनी लांडेवाडी भोसरी येथून मोबाईल आणि पैसे चोरल्याचे सांगितले. दरम्यान तपास करत आसताना यांनी श्रीगंगानगर राजस्थानमधील पुराणी अबाधी येथे खुनाचा गुन्हा केल्याचे समोर आले. तेंव्हापासून जगदीश फरार असून त्याच्यावर दहा हजार रुपये, तर इतर दोघांवर पाच हजार रुपयांचे राजस्थान पोलिसांनी बक्षीस जाहीर असल्याचे समजले.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, राजेंद्र शिंदे, विक्रांत गायकवाड, शैलेश सूर्वे, उमेश पुलगम, किरण काटकर, शरीफ मुलानी, किरण खेडकर, आशिष बोटके, प्रदीप गोडांबे, प्रवीण कांबळे, सागर शेडगे, सुधीर डोळस यांच्या पथकाने केली.