अखेर का रतन टाटांनी आपल्या कुत्र्याचे नाव ठेवले ‘गोवा’, सांगितला मजेदार ‘किस्सा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांना प्राणी आवडतात. विशेषत: त्यांना कुत्री खूप आवडतात. याचा अंदाज यावरूनच बांधला जाऊ शकतो कि, टाटा समूहाच्या जागतिक मुख्यालयाचा काही भाग म्हणजे बॉम्बे हाऊस केवळ रस्त्यावरच्या कुत्र्यांसाठीच आहे. या कुत्र्यांमध्ये सर्वात लोकप्रिय म्हणजे गोवा नावाचा काळा आणि पांढरा रंगाचा कुत्रा. गोवा हा रतन टाटांचा सर्वात आवडता कुत्रा असल्याचे मानले जाते. ‘मी ऑफिसमध्ये या कुत्र्याला भेटण्यास नेहमीच उत्सुक असल्याचेही रतन टाटा म्हणाले.

रतन टाटाने यापूर्वी दिवाळीनिमित्त एक चित्र शेअर केले होते ज्यात ते गोव्याबरोबर इतर कुत्र्यांसमवेतही दिसले होते. त्यांनी या पोस्टच्या कमेंट सेक्शनमधील एका रंजक कथेच्या मदतीने हे देखील सांगितले की कुत्र्याचे नाव गोवा का ठेवले गेले. 82 वर्षीय रतन टाटा यांच्या कमेंट सेक्शनमध्ये एका चाहत्याने विचारले की, कुत्राचे नाव गोवा कसे पडले? त्याला उत्तर देताना रतन टाटा म्हणाले की, तो एक लहान पिल्लू होता, जो गोव्यात इकडे – तिकडे फिरत होता. यानंतर, तो आला आणि माझ्या गाडीत बसला आणि थेट आमच्याबरोबर बॉम्बे हाऊसमध्ये येऊन थांबला. गोव्याहून आल्याने त्याचे नावही गोवाच पडले.

दरम्यान, सुमारे एक वर्षापूर्वी रतन टाटाने इंस्टाग्रामवर आपले अकाउंट तयार केले होते आणि ते बहुतेकदा थ्रोबॅकची छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर करतात. त्यांनी फक्त टाटा ट्रस्ट नावाचे इन्स्टाग्राम अकाउंट फॉलो केले असून त्यांचे तीन दशलक्षाहून जास्त फॉलोअर्स आहेत.