रविकांत तुपकरांचा रयत क्रांती संघटनेत प्रवेश : सदाभाऊ खोत

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन  – माजी खासदार राजू शेट्टी यांचे समर्थक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर रयत क्रांती संघटनेत प्रवेश करणार आहेत. संघटनेचे संस्थापक मंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहीती दिली. दोन दिवसापुर्वी तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान तुपकर भाजपमध्ये जाणार या चर्चेला यामुळे पूर्णविराम मिळाला आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांचे विश्वासू सहकारी म्हणून रविकांत तुपकर यांची ओळख होती. यापूर्वी तुपकर भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. मात्र लोकसभा निवडणुकीत तुपकर राजू शेट्टी यांच्यासोबत राहिले. त्यानंतर तुपकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा थांबल्या होत्या. त्यांनंतर 4 दिवसापूर्वी सोशल मीडियावर तुपकर भाजपमध्ये जाणार असल्याचे मेसेज व्हायरल झाले.

नंतर तुपकर यांनी शेट्टी यांच्या संघटनेच्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तुपकर भाजप मध्ये जाणार अशी चर्चा होती. पण शुक्रवारी मंत्री सदाभाऊ खोत यांनी तुपकर यांच्या रयत क्रांती संघटनेत प्रवेशाची घोषणा केली. त्यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शनिवारी दुपारी बारा वाजता मुंबई येथील गरवारे क्लब मध्ये तुपकर रयत क्रांती संघटनेत प्रवेश करणार आहेत. ना. सदाभाऊ खोत यांनीच स्वत: ही माहीती दिली.