सुरक्षाकर्मींच्या प्राणाचे काहीच मोल नाही का ? : रेणुका शहाणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा डांबर प्लॉंट व ३६ हून अधिक गाड्या जाळल्यांची घटना पहाटे घडल्यानंतर त्या ठिकाणी जात असलेल्या क्यूआरटी पथकला भूसूरुंगात IED स्फोट करून उडवून लावल्याची घटना घडली आहे. ही घटना कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ घडली आहे. दरम्यान, या घटनेत १६ हून अधिक क्यूआरटीचे जवान शहीद झाले आहेत. या घटनेबाबत ‘सुरक्षाकर्मींच्या प्राणाचे काहीच मोल नाही का’? असा सवाल अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी केला आहे.

सुरक्षाकर्मींच्या प्राणाचे काहीच मोल नाही का ?

या घटनेचा निषेध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील केला तर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या कलाकारांनी देखील याबाबतीत प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी याबाबतीत ट्विट केले आहे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ” निषेध! या नक्षलवाद्यांचा निषेध, या भ्याड हल्ल्याचा निषेध! ज्या सुरक्षाकर्मींचे प्राण गेले त्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली. एकीकडे आतंकवाद तर दुसरीकडे नक्षलवाद, आपल्या सुरक्षाकर्मींच्या प्राणाचे काहीच मोल नाही का? त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हा संताप व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हैदोस

नक्षल्यांच्या भूसूरुंगाच्या स्फोटाला सरकारने दुजोरा दिला आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोंबींग ऑपरेशन करण्यात येणार असल्याचे गृहराज्य मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले आहे. महाराष्ट्र दिनीच घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

सीआरपीएफच्या क्वीक रिस्पॉनस् टीममधील जवान खासगी वाहनाने जात असताना ही घटना घडली. नक्षलींना चकवण्यासाठी जवानांनी खासगी वाहनाचा आधार घेतला होता. मात्र नक्षलींना याविषयी कुणकुण लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती, की जवान प्रवास करत असलेल्या वाहनाच्या अशरश: चिंधड्या उडाल्या आहेत.

मंगळवारी मध्यरात्री कुरखेडा तालुक्यातील दादापूर(रामगड) येथे नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील तब्बल ३६ वाहने, यंत्रसामग्री व कार्यालये जाळली. त्यानंतर बुधवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास जलद प्रतिसाद पथकातील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला. यात १५ जवान शहीद झाले असून खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे.